पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र; बीड जिल्ह्यातील तिघांवर गुन्हा दाखल

पुणे ग्रामीण पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करणार्‍या दहा उमेदवारांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस उपअधीक्षक (गृह) युवराज मारुती मोहिते यांनी फिर्याद दिली आहे. या आरोपीमध्ये बीड जिल्ह्यातील तिघा जणासह दहा जणांचा समावेश आहे. त्यानुसार सोमिनाथ सुधाकर कंटाळे (रा. पाडळी. जि. बीड), अजय बब्रूवान जरक (रा. टाकळी, पो. आडेगाव, जि. सोलापूर), अक्षय याळासाहेब बडवे (रा. सोमनाथनगर, कोंढवा. बु.), दिनेश अर्जुन कांबळे (रा. ब्रम्हगाव, ता. जि. बीड), राजेश रमेश धुळे (रा. नांदेड), अमोल विठ्ठल गरके (रा. बेंबर, जि. नांदेड), घुपत प्रल्हाद खारोडे (रा. वाकड, जि. नांदेड), गोविंद भक्तराज मिटके (रा. शिवणगाव, जि. उमरी), आसाराम बाळासाहेब चौरे (रा. जिवाचीवाडी, जि. बीड), हेमंत विठ्ठल निकुम (रा. दत्तविहार, वाघोली, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस महासंचालक यांच्या निर्देशानुसार पुणे पोलिस ग्रामीण दलात पोलिस शिपाई पदाची भरती 2021 मध्ये घेण्यात आली होती. या भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणी, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना हजर करण्यापूर्वी त्यांनी भरती प्रक्रियेदरम्यान सादर केलेली शैक्षणिक व इतर कागदपत्रे पडताळणीनंतर समांतर आरक्षणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे पडताळणी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय (पुनर्वसन) यांना पाठवण्यात आली होती. सोमिनाथ कंटाळेसह 10 उमेदरावांकडून पुणे ग्रामीण अधीक्षकांकडे, जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी (बीड) यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अहवाल सादर करण्यात आला. मात्र या दहा जणांना बीड कार्यालयातून अशा प्रकारे प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र दिले नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे पुणे पोलिस ग्रामीण दलात सामील होण्यासाठी शासनाची फसवणूक करून स्वतःच्या फायद्यासाठी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देणार्‍या पुणे ग्रामीण पोलिस दलातील दहा उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव करत आहेत. उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करताना, काही संशयास्पद बाबी आढळून आल्या. त्यामुळे बीड जिल्हाधिकारी तथा पुर्नवसन अधिकारी यांच्याकडे संपर्क साधून माहिती मागविण्यात आली. त्या वेळी हा बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आणि तोतयागिरीचा प्रकार समोर आला.युवराज मारुती मोहिते, पोलिस उपअधीक्षक (गृह) पुणे ग्रामीण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page