कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहणारे प्रसन्ना बी. वराळे यांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती म्हणून नुकतीच शपथ दिली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या सरन्यायाधीशपदाच्या कार्यकाळात न्यायवृंदांमार्फत नियुक्त झालेले ते १५ वे न्यायमूर्ती आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्त होणाऱ्या मोजक्या न्यायमूर्तीपैकी न्या. प्रसन्ना वराळे हे एक. विधि क्षेत्रातला त्यांचा प्रवास तत्कालीन औरंगाबाद व आताच्या छत्रपती संभाजीनगरमधला. कायद्याचे शिक्षण त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास वराळे यांच्या कुटुंबीयांना लाभला. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा आणि अभ्यासूपणाचा मोठा प्रभाव वराळे कुटुंबीयांवर होता. कामातली शिस्त त्यांच्या न्यायालयीन दैनंदिनींमध्येही सुबक अक्षरात दिसत असे. न्यायालयीन प्रकरणातील युक्तिवादाचे मुद्दे, संदर्भ त्या प्रकरणाशी पूर्वी विविध न्यायालयांनी दिलेले निकाल अशा मराठी भाषेतील नोंदी पाहून त्यांचे सहकारी अक्षरश: थक्क होत. ते उत्तम वक्ते. एकदा बोलायला उभे राहिले तर ज्या भाषेत बोलतील त्या भाषेत दुसऱ्या भाषेतील एकही शब्द येणार नाही. सहकाऱ्यांना शब्दांचे अर्थही ते आवर्जून सांगत. वाचनाचा आवाका अफाट या शब्दातच वर्णावा असा. त्यातही गालिब, तुकाराम, साहिर यांपासून आंबेडकर, सावरकर यांचेही ग्रंथ व्यक्तिगत संग्रहात ठेवणाऱ्या प्रसन्ना बी. वराळे यांचा शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम गायनातील कान तयार. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील सहकाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावत. या काळात होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यात ते सहभागी होणारे म्हणून मराठवाडय़ातील विधि क्षेत्रात अनेकजण त्यांना ओळखतात.

Advertisement

कर्नाटक राज्याचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम करताना त्यांनी अनेक समाजोपयोगी प्रकरणात स्वत:हून याचिका दाखल करून घेऊन व्यवस्था अधिक चांगल्या व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले. त्यांचा सर्व धर्म, परंपरांचा अभ्यासही दांडगा आहे. या बाबतीत बाबासाहेबांच्या आदर्शाचा संस्कार वराळे यांच्यावर आहे. औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांनी वकिली केली. त्यांनी औरंगाबाद खंडपीठात सहायक सरकारी वकील म्हणून काम केले. त्यानंतर खंडपीठातच ते मुख्य प्रशासकीय न्यायमूर्तीही झाले. १५ ऑक्टोबर २०२२ रोजी न्या. वराळे यांची कर्नाटकचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली. तेव्हा आपला माणूस म्हणून छत्रपती संभाजीनगर, मुंबई आणि नागपूर येथील १०० हून अधिक जण शपथविधी सोहळय़ास गेले होते. २३ जून १९६२ रोजी जन्मलेले न्या. वराळे हे २२ जून २०२७ रोजी निवृत्त होतील. सम्यक दृष्टीचे व न्यायप्रिय अशी त्यांची ओळख आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page