शेतातील विद्युत पोलच्या ताण तारेला स्पर्श झाल्याने बाप लेकाचा मृत्यू
आष्टी — शेतात काम करत असलेल्या बाप लेकाला शेतात असलेल्या विद्युत खांबाच्या ताणतारेत करंट उतरला होता. त्याला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी टाकळसिंग येथे घडली. रात्री उशिरा दोघांवरही एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दादासाहेब विनायक कुमकर वय 55 वर्ष, बिभीषण दादासाहेब कुमकर वय 32 वर्ष अशी मयत पिता-पुत्रांची नावे आहेत.
टाकळसिंग येथील शेतकरी दादासाहेब कुमकर व बिभीषण कुमकर हे आपल्या शेतात नव्याने डाळिंब बागाची लागवड करण्यासाठी काम करत होते. यावेळी शेतातील विद्युत खांबाला असलेल्या ताणतारेला करंट उतरला होता. या तान तारेला स्पर्श झाल्याने दोघांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती कळताच नातेवाईक, शेजारील नागरिकांनी शिवारात धाव घेतली. बिभीषण यास उपचारासाठी जामखेड येथे घेऊन जाताना वाटेतच प्राणज्योत मालवली. तर त्याचे वडील दादासाहेब यांना आष्टी येथील रुग्णालयात दाखल केले, परंतु त्यांचाही मृत्यू झाला.घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक शरद भुतेकर, पोह. अशोक शिंदे, पोना. प्रवीण क्षीरसागर, पोशि. मजर सय्यद, पोशि. राजाभाऊ सदगुणे यांनी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर मंगळवारी रात्री टाकळसिंग येथे एकाच चितेवर बाप लेकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादासाहेब कुमकर यांना पत्नी, मुलगा, मुलगी तर बिभीषण कुमकर यांना पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
शेतकरी मित्रांनी काळजी घ्यावी